सज्जनगड — समर्थांचे अंतिम वास्तव्यस्थान
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सद्गुरूस विश्रांती मिळावी या हेतूने श्री समर्थांसाठी सज्जनगडावर मठ बांधून दिला आणि गडाची उत्तम व्यवस्था राखण्याचे आदेश दिले. इ.स. १६७६ साली समर्थ कायमस्वरूपी सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. या गडावर समर्थांचे वास्तव्य शेवटची सहा वर्षे होते. इ.स. १६८२ जानेवारीला समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला.
ज्या ठिकाणी समर्थांना अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी तळघरात समाधी मंदिर व त्यावर राममंदिर, छत्रपती संभाजीराजांनी बांधले. समर्थांच्या पश्चात अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ येथील कारभार सांभाळला.
त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. १७१० माघ शुक्ल पंचमी या दिवशी श्री समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ गंगाधर यांचे नातू गंगाधरबुवांना सज्जनगडावर आणून चाफळ व सज्जनगडाचा कारभार त्यांच्या स्वाधीन केला. इ.स. १८४७ पर्यंत पुत्रपरंपरेने कारभार चालला. महारुद्र स्वामींना पुत्र नसल्यामुळे त्यांनी लक्ष्मणस्वामींना दत्तक घेतले; तेव्हापासून दत्तक परंपरेने सज्जनगडाचा कारभार सुरू झाला.
याच सुमारास इ.स. १८४८ ला छत्रपतींचे सातारा येथील राज्य खालसा होऊन इंग्रजांची सत्ता सुरू झाली. यामुळे राजघराण्याचे चाफळ व सज्जनगडाकडे दुर्लक्ष झाले. देवस्थानाचे उत्सव व नैमित्तिक कार्य याकरिता पैसा अपुरा पडू लागला. मठाची दुर्दशा होऊ लागली.
स.भ. नानासाहेब देव
इ.स. १९०१ च्या दरम्यान इतिहासाचार्य राजवाडे यांनी “रामदास” हा निबंध प्रकाशित केला, यामुळे समर्थांच्या अभूतपूर्व राष्ट्रीय कार्याचे ज्ञान समाजास झाले. धुळ्याचे स.भ. नानासाहेब देव यांचे या निबंधाकडे लक्ष वेधून समर्थांचे अप्रसिद्ध वाङ्मय छापण्याचा देवांनी संकल्प केला. त्यानंतर त्यांनी डोंमगाव येथे जाऊन कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाच्या मूळ प्रती वरून दुसरी प्रत तयार केली आणि ती तपासून १९०५ साली “रामदास-रामदासी” या मालिकेतील पहिला भाग म्हणून सटीप दासबोध छापला.
१९०४ पासून त्यांनी अथक प्रयत्न करून समर्थ संप्रदायाच्या मठांचे संशोधन केले आणि समर्थ संप्रदायाचा वाङ्मयीन ठेवा (हस्तलिखिताची बाडे) गोळा केला. अप्रकाशित वाङ्मयाच्या प्रकाशनाला सुरुवात केली. यामुळे समर्थकृत वाङ्मय लोकांसमोर आले.
समर्थ संप्रदायिक स्थानांचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून भारतभर प्रवचने करून १९३२ साली समर्थांच्या जन्मस्थानी जांब येथे नानासाहेब देवांनी समर्थ मंदिर बांधले आणि ते ट्रस्टच्या हवाली केले. १९३५ साली समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे उभे केले व त्यात समर्थ संप्रदायाचा वाङ्मयीन ठेवा जतन केला.
१९३९ साली समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी ठिकठिकाणी समर्थ संघ निर्माण केले. समर्थ संप्रदायाला ऋणी करून १९५८ साली नानासाहेब देव समर्थपदी लीन झाले.
श्रीधर स्वामी व मंडळाची स्थापना
१९२७ साली श्रीधर स्वामी सज्जनगडावर आले आणि समर्थांची सर्व प्रकारे सेवा करून व साधना करून समर्थ कृपा संपादन केली. १९३० साली कर्नाटकात गेले व तेथे समर्थ संप्रदायाचा प्रसार केला.
१९३५ साली ते पुन्हा गडावर आले तेव्हा दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा असे साधनेकरिता आलेले रामदासी त्यांच्या भोवती गोळा झाले. ही सर्व रामदासी मंडळी जमेल तशी समर्थ सेवा निस्पृहपणे करीत होती. त्यावेळी सज्जनगडावरील देवस्थानाची व्यवस्था समाधानकारक नव्हती, कारण इ.स. १९२८ सालापासून बापूसाहेब स्वामींनी पुत्रांतील कलहामुळे व संस्थानला कर्ज झाल्यामुळे संस्थानचा कारभार कोर्ट ऑफ वॉर्डसकडे सोपविला होता. देवालयांचे व वास्तूंचे दैन्य अनेकांना विषण्ण करीत होते.
त्यावेळी साधनेसाठी येऊन राहिलेले दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा, अण्णाबुवा असे अनेक रामदासी एकत्र येऊन १९३९ साली नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर “समर्थ संघा”ची शाखा निर्माण झाली. या रामदासींना माध्यान्हीच्या जेवणाची सोय नव्हती; ते गडाखालील खेडेगावांमधून भिक्षा आणून स्वयंपाक करून समर्थांना नैवेद्य दाखवीत.
इ.स. १९४७–४८ च्या दरम्यान उद्योगपती समर्थभक्त बाबुराव वैद्य (सातारा) गडावर आले व समर्थपूजेतील जीर्ण उपकरणे पाहून जीर्णोद्धाराचा संकल्प केला. दिनकरबुवांसारख्या रामदासींना घेऊन विचारविनिमय करून समर्थसेवेकरिता एक मंडळ निर्माण करण्याचे ठरले.
मंडळाची घटना तयार करून दिनांक ९ जानेवारी १९५०रोजी प.पू. श्रीधरस्वामींचा आशीर्वाद घेऊन श्री समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी “श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड” ही संस्था स्थापन करून कायद्यानुसार रजिस्टर्ड करण्यात आली.
“श्री समर्थांच्या कार्याचा, तत्त्वज्ञानाचा, वाङ्मयाचा प्रसार सर्वत्र करून श्री समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सर्व स्थानांचे नंदनवन करा, समर्थ तुमच्या पाठीशी आहेत.”— प.पू. श्रीधर स्वामी, मंडळ-स्थापना आशीर्वाद
श्री समर्थ पादुका प्रचार दौरा
श्री समर्थ सेवा मंडळ स्थापन झाले त्यावेळी सज्जनगडावर येण्यासाठी परळीच्या पायथ्यापासून संपूर्ण गड चढावा लागत असे. गडावर आल्यावर राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, नित्यविधीची धड सोय नाही, वीज नाही. यामुळे उत्सव सोडला तर एरवी भाविकांची ये-जा नसे.
भाविकांचा सहभाग असल्याशिवाय समर्थकार्याचा प्रसार होणार नाही हे जाणून कै. बाबुराव वैद्य यांनी श्रीसमर्थांच्या पादुका घेऊन महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर भिक्षा दौरा आयोजित करण्याची संकल्पना मांडली आणि निस्पृह रामदासींच्या सहकार्याने ती मूर्तस्वरूपात आणली. प्रथम बद्रीनारायणाला पादुका नेल्या; वाटेत मोठी शहरे घेतली — त्यावेळी झालेल्या स्वागत सोहळ्यामुळे श्रीसमर्थकृपेची ओढ समाजात किती आहे याचा प्रत्यय आला आणि पादुका प्रचार दौऱ्याची कार्यपद्धती निश्चित झाली.
१९४९ पासून श्री समर्थ सेवा मंडळाने चालू केलेल्या पादुका प्रचार दौऱ्यामुळे लोकांना समर्थ कार्याचा, वाङ्मयाचा, तत्त्वज्ञानाचा परिचय झाला. या प्रचार दौऱ्यांमुळे सज्जनगडावर दर्शनार्थींचा ओघ सुरू झाला. समर्थ कार्यासाठी आवश्यक अर्थसाहाय्य लाभले, यातूनच जीर्णोद्धाराच्या कार्याला गती मिळाली. २००० साली प्रथम भारताबाहेर सिंगापूर येथे श्री समर्थ पादुकांचा प्रचार दौरा आयोजित केला. २००८ पासून प्रतिवर्षी विदेशात हा दौरा आयोजित करण्यात येतो.
सज्जनगड मासिक व वाङ्मय प्रकाशन
समर्थ विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुद्रित स्वरूपात प्रचार साधन हवे म्हणून १९५१ला प्रथम पत्रिकास्वरूपात व लगेचच मासिक स्वरूपात ‘सज्जनगड’ मासिक सुरू झाले. त्यामुळे समर्थांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा आणि वाङ्मयाचा परिचय महाराष्ट्रात झाला. सेवा मंडळाने हाती घेतलेल्या समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धार कार्याचा लोकांत प्रचार झाला. मासिकाला परदेशातूनही मागणी येऊ लागली. मासिकाच्या निमित्ताने अनेक मान्यवर लेखकांनी सरस्वतीची उपासना केली आणि त्याचा लाभ हजारो वाचकांनी घेतला, घेत आहेत.
समर्थ वाङ्मय लोकांपर्यंत पोहोचवून लोककल्याण साधावे या हेतूने समर्थ सेवा मंडळाने १९५३ पासून ग्रंथ प्रकाशनास सुरुवात केली. त्यात प्रथम सचित्र सज्जनगड, मनाचे श्लोक, समर्थ चरित्र, नित्यनेम सोपान, समर्थांचे फोटो यांचे प्रकाशन झाले.
या प्राथमिक उपक्रमांबरोबरच बाबुराव वैद्य यांनी मान्यवरांच्या भेटी घेऊन राष्ट्रगुरु श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगडाचा जीर्णोद्धार किती आवश्यक आहे हे पटवले. त्यातून नियमित वर्गणी देणारे लोक मिळविले. काहींनी मोठ्या देणग्या दिल्या. सामान्य लोकही जमेल तेवढी मदत करू लागले. येणाऱ्या पैशाचा चोख हिशेब व पत्रव्यवहार स.भ. माधवराव हिरळीकर यांनी उत्तम सांभाळला.
सज्जनगडावरील जीर्णोद्धाराची कार्ये
येणाऱ्या देणगीतून एकीकडे जीर्णोद्धाराच्या कार्याला दिनकरबुवा, अय्याबुवा आदी निस्पृह रामदासींनी वाहून घेतले. सज्जनगडाचा कायापालट होऊ लागला. मंदिरातील पूजा-अर्चा व नैवेद्याची उत्तम व्यवस्था करून सेवा करणाऱ्यांची भोजन व्यवस्था केली. मोडकळीस आलेला समर्थांचा मठ दुरुस्त करून दुमजली बांधणी केली व गॅलरी उभारली. मंदिराचे शिखर दुरुस्त केले.
समर्थभक्त वणीकर, पुण्याचे समर्थभक्त देवल व समर्थभक्त भाऊराव आठवले यांच्या सहकार्याने १९५३ साली वसंतपंचमीच्या दिवशी समर्थमंदिरासाठी सोन्याचा मुलामा दिलेला कळस मंदिरावर बसवला. गडावरील तळ्यातील गाळ काढला. समर्थांच्या पूजेला मुबलक तुळशी व फुले हवी म्हणून बागेची जोपासना केली.
समर्थांचा ३५०वा जन्मोत्सव भव्य प्रमाणात सज्जनगडावर साजरा केला. श्रीधर स्वामींनी वर्षभर प्रवचने करून समर्थ संप्रदायाचा प्रसार केला.
सज्जनगडावर भव्य कीर्तन संमेलन आयोजित केले. १३ कोटी रामनाम जपाचा संकल्प सोडला व त्याच वर्षी त्याची सांगता झाली.
लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘लोकमान्य टिळक कमान’ बांधली.
सातारा येथे ‘समर्थ सदन’ ही वास्तू खरेदी केली. ज्यांना गडावर येणे शक्य नाही त्यांच्यासाठी समर्थ सदनमध्ये दासनवमी उत्सव सुरू केला.
चाफळ येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमान मफतलाल शेठ यांच्या सहकार्याने श्री समर्थ सेवा मंडळाने पूर्ण केला.
सुगम विवरण असलेला स.भ. प्रा. के. वि. बेलसरेकृत सार्थ दासबोध श्री समर्थ सेवा मंडळाने प्रकाशित केला. आतापर्यंत त्याच्या २९ आवृत्या निघाल्या आहेत.
सज्जनगडावर एस्.टी. येऊ लागली. सेवा मंडळाने २२५ दगडी पायऱ्या बांधून मार्ग सोपा केला. उरमोडी नदीचे पाणी गडावर आणले.
कै. द्वा. वा. केळकर (अप्पा) यांनी ‘पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रमा’ची संकल्पना साकार केली.
समर्थ विद्यापीठाची स्थापना मामासाहेब गांगल यांनी शिवथरघळ येथे केली. संस्कार वर्ग सुरू करण्यात आले.
प्रथम भारताबाहेर सिंगापूर येथे श्री समर्थ पादुकांचा प्रचार दौरा आयोजित केला.
संत सेवा पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात केली.
प्रतिवर्षी विदेशात पादुका प्रचार दौरा. भाविकांसाठी ५० खोल्या, शौचालये, स्नानगृहे बांधली. गडाभोवती रस्ता व कट्टे बांधले.
मंडळाचे कार्य
Four pillars of seva carried forward through the decades
जीर्णोद्धार व सेवा
सज्जनगडावरील समर्थ समाधी मंदिर, पूजाउपकरणे व परंपरांचे जतन आणि नित्यसेवा.
ग्रंथप्रसार
श्रीग्रंथराज दासबोध व समर्थवाङ्मय घरोघरी पोहोचवण्याचे सातत्यपूर्ण कार्य.
दासबोध अध्ययन
पत्रद्वारा व पोर्टलद्वारे क्रमवार स्वाध्याय, समीक्षण आणि “दासबोध प्रवीण” उपक्रम.
समाजप्रबोधन
“शहाणे करून सोडावे सकळ जन” — समर्थांचा पुरुषार्थ-विचार समाजात रुजवणे.
मार्गदर्शक व संचालक
The seers and sevaks whose vision shaped this work
याप्रमाणे श्री समर्थ सेवा मंडळाच्या कार्याला श्री श्रीधर स्वामींचा आशीर्वाद व कै. बाबुराव वैद्य, कै. माधवराव हिरळीकर, कै. बन्याबापू गोडबोले, स.भ. अरुणराव गोडबोले, माजी कार्यवाह कै. दिनकरबुवा, माजी कार्यवाह कै. मारुतीबुवा आणि विद्यमान कार्यवाह स.भ. योगेशबुवा रामदासी व इतर अनेक निस्पृह रामदासी मंडळी यांचे अथक प्रयत्न व असंख्य दानशूर भक्तांचे तन-मन-धनाचे साहाय्य यातून सज्जनगडाचा कायापालट झाला व दूरवर संप्रदायाचा प्रसार झाला आहे, होत आहे.
१९३८ सालापासून सुरू केलेल्या कार्याचा आता वटवृक्ष झाला आहे. हे समर्थ विचार प्रसार कार्य यापुढेही समर्थभक्तांच्या व सेवा मंडळाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडून सज्जनगडावर व शिवथरघळ येथे असेच जोमाने सुरू राहील.
मंडळाच्या सेवाकार्यात सहभागी व्हा
अध्ययनात सहभागी व्हा किंवा देणगीद्वारे समर्थविचारप्रसाराला हातभार लावा.
